कृपया ह्या सेनेमध्ये सामील होण्यासाठी खाली "लिंक" वर आपली माहिती भरा....

https://spreadsheets.google.com/spreadsheet/viewform?formkey=dEVjc0Y0VzdWNlU3U2wxa1ZHY1A5b1E6MQ

Thursday 22 September 2011

स्वातंत्र्यवीर सावरकर

स्वातंत्र्यवीर सावरकर
'हिंदुत्व' हा शब्दच ज्यांनी दिला आणि आधुनिक हिंदुत्व ज्यांनी एका अर्थाने सुरु केलं त्या स्वातंत्र्यवीर सावरकरांचे जात्युच्छेदनामध्ये सर्वात मोठे योगदान आहे. ज्या काळात देशात अस्पृश्यता होती, देशावर अनेक अंधश्रध्दा, कालबाह्य रुढी-परंपरांचा प्रभाव होता तेव्हा सावरकरांसारख्या अस्सल बुद्धिवाद्याने, विज्ञानवाद्याने आणि हिंदुत्ववाद्याने त्यावर अखंड प्रहार केले. आपल्या लेखनाने कोणी सनातनी दुखावेल म्हणून त्यांनी ते विचार मांडणे सोडले नाही. त्यांनी रत्नागिरीमधील वास्तव्यामध्ये अनेक समाजसुधारणा केल्या. जवळपास ५०० मंदिरे अस्पृश्यांसाठी खुली केली. अनेक आंतरजातीय विवाह लावले. अनेक सहभोजने आयोजित केली. त्यांनंतर सर्वांसाठी 'पतित पावन मंदिर' सुरू केले व सर्वांसाठी भोजनालय ही सुरू केले. या सर्वांमुळे सनातनी ब्राह्मण भडकले व सावरकरांना 'धर्मद्रोही' ठरवून 'त्यांना पेशवाई असती तर हत्तीच्या पायाखाली दिले गेले असते' असा ठराव मांडला. त्यावर ३००० ब्राह्मणांनी सह्या केल्या. सावरकरांनी त्यावर 'शिवशाहीत अथवा, पहिल्या बाजीरावाच्या पेशवाईत आमच्यासारख्या हिंदू संघटकांना हत्तीच्या पाठीवरील अंबारीत मिरवले जाण्याचाच संभव अधिक होता' असे सडेतोड उत्तर दिले. 'भटशाही' संपवण्यासाठी पूजा, पाठ, गौरी, गणपती, सोयरसुतक, संक्रांत, दिवाळी, दसरा, द्वादशी यांना भटास बोलावू नका असे सांगितले. त्याचबरोबर काशीतील ब्राह्मण महासंमेलनाची तुलना त्यांनी माकडांशी केली. त्यात 'काशीत दोन महासंमेलने भरली - एक माकड महासंमेलन आणि दुसरे भाकड महासंमेलन. माकडे परिवर्तनीय तरी आहेत. पण सनातनी तर काळ, वेळ, परिस्थिती या गोष्टीच बघत नाहीत. अशा वागण्यामुळे निदान काशीच्या भाकड महासंमेलनातील पंडित हे तरी माकडांची विकसित श्रेणी नसून तेथील माकडेच त्या पंडितांची विकसित श्रेणी आहे हे म्हणणे क्रमप्राप्त आहे' असे लिहित त्याची खिल्ली उडवली. पण अजूनही अशी 'महासंमेलने' आपल्याकडे आयोजित होत आहेत आणि ती करण्यात अनेकांना 'गर्व' आहे यावरून सावरकरांना अपेक्षित असलेला समाज किती दूर आहे हे लक्षात येते. जाती मोडण्यासाठी ब्राह्मणांनीच पुढे यावे हे ही त्यांनी सांगितले.

सावरकरांनी अतिशय स्पष्ट शब्दात जातीव्यवस्थेवर हल्ला केला. अनुवंशात जातीचे मूळ आहे. त्या मुळावरच सावरकरांनी हल्ला चढवत अनुवंश हा आचरटपणा आहे, जर ब्राह्मणाच्या घरी 'ढ'जन्मला तर त्याला 'ढ'च म्हटले पाहिजे आणि जर शुद्रात 'ज्ञ' निघाला तर त्याला 'ज्ञ'च म्हटले पाहिजे, मग त्याचा बाप, आजा अथवा पणजा 'ढ' असो की 'ज्ञ' असो. सावरकरांनी हल्ला करताना 'आपले हिंदुत्वाचे समर्थक दुखावतील' वगैरे फाजिल भीती न बाळगता त्यांचे प्रबोधन केले. सावरकर म्हणतात की 'आज आमच्या हिंदू समाजात पोथीत तसे लिहिले आहे ह्या सोडून इतर कोणत्याही लक्षणाने सहज विभिन्नत्व विविध जातींमधे दिसून येत नाही. जात मानणे ही मूळ चूक! त्यात महादेवाच्या जटेपासून ही जात निघाली आणि ब्रह्मदेवाच्या बेंबीपासून अमुक जात निघाली इत्यादी उपरत्या अक्षरशः खर्‍या मानून त्या त्या जातींच्या अंगी ते ते गुण उपजतच आहेत हे मानणे ही घोडचूक!! अन् तो गुण त्या जातीच्या संतानात प्रकट झाला नसला तरी तो आहेच समजून तशी उच्च-नीचता त्या संतानास भोगावयास लावणे ही पहाड चूक. 'सावरकरांनी मनु:स्मृती जाळली नसली तरी तिचे विचार मात्र जाळले असेच म्हणावे लागेल. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची 'Annihilate the Caste' हीच शिकवण सावरकरांनी दिली. जातीव्यवस्था मोडण्यासाठी त्यांनी सात बेड्या मोडायला हव्यात हे सांगितले. त्या लेखात ते म्हणतात, पोथीजात जातीभेद हा मनाचा रोग आहे. मनाने तो मानला नाही की झटकन बरा होतो.

त्यानंतर त्या सात बेड्या म्हणजे १)वेदोक्तबंदी {स्वतःच्या क्षत्रियादिक धर्मबंधूंनासुध्दा वेदोक्ताचा अधिकार नाही असे म्हणणारी भटबाजी यापुढे चालणार नाही.-सावरकर}२) व्यवसायबंदी ३) स्पर्शबंदी ४) सिंधूबंदी ५) शुद्धीबंदी ६) रोटीबंदी ७) बेटीबंदी. आपल्याकडे अजूनही बेटीबंदी मोठ्या प्रमाणात आहे.सावरकरांनी आंतरजातीय विवाहांना समर्थनच दिले नाही तर स्वतः आंतरजातीय विवाह लावले.

अस्पृश्यता हा गुन्हा ठरवण्यात आला त्या दिवसाची नोंद भारतीय इतिहासात सुवर्णाक्षरांनी करण्यात यावी असे सावरकर म्हणत. त्यानंतरच्या दहा वर्षात अस्पृश्यता संपवली नाही तर अजून शंभर वर्ष त्याला लागतील असेही सावरकरांनी सांगितले जे बर्‍याच प्रमाणात खरे आहे असे दिसून येते. हिंदू महासभेचे अध्यक्ष असताना त्यांनी महासभेच्या कार्यकर्त्यांना व नेत्यांना अस्पृश्यता निवारणासाठी गेल्या २०० वर्षात झाले नाही तितके काम येत्या २ वर्षात करायचे असा आदेश दिला होता. सावरकर प्रखर विज्ञानवादी होते. शुद्धीच्या वेळी गंगामाईचे पाणीही शिंपडायची गरज नाही असे त्यांनी सांगितले. जातीव्यवस्था पाळण्यात दोष सर्वांचा असला तरी गेल्या ८-१० दशकात तरी अस्पृश्यतेसारखी राष्ट्रविघातक रुढी पाळून चातुर्वर्णिक स्पृश्यांनी एक राष्ट्रघातक पाप केले आहेअसे ते म्हणतात. सावरकरांचे विचार स्पष्ट होते. ते सनातनास अपरिवर्तनीय सत्य न मानता सत्यास अपरिवर्तनीय - सनातन मानत. जात्युच्छेदनासाठी त्यांची शिकवण फार महत्वाची आहे. पण हिंदुत्ववाद्यांकडून त्यांच्या विचारांकडे बर्‍याच प्रमाणात दुर्लक्ष झालेले दिसते. नवतरुण वर्ग सावरकरांच्या विचारांनी प्रभावित नक्की होऊ शकेल. गरज आहे फक्त एका सक्षम नेतृत्वाची. हिंदुत्ववाद्यांमधे जात्युच्छेदनाच्या कामातील मानबिंदू म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर. शेवटच्या कालखंडात सावरकरांनी सांगितले होते की 'माझी मार्सेलिसची उडी विसरली तरी चालेल पण माझे रत्नागिरीतील कार्य विसरु नका'. हिंदुत्वासाठी, राष्ट्रवादासाठी आणि सर्वात महत्वाचे म्हणजे माणुसकीसाठी जात्युच्छेदन सर्वात महत्वाचे आहे हे सावरकरांनी बरोबर ओळखले होते. आजकाल आपले समर्थक दूर जातील म्हणून फक्त विरोधकांवरच हल्ला करणारे लोक आहेत. त्यामुळेच ते यशस्वी 'राजकीय' नेते आहेत तर सावरकर 'विचारवंत, प्रबोधक व समाजसुधारक' ठरतात.

No comments:

Post a Comment